Rishi Sunak New Job : ज्यांच्या सासऱ्याची ७ लाख कोटी मूल्य असलेली आयटी कंपनी आहे, पत्नी अब्जाधीश आणि ब्रिटने माजी पंतप्रधान आहेत. असे असूनही ही व्यक्ती आता मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी करणार आहे. वाचायला जरा विचित्र वाटतंय ना? पण, हे खरं आहे. आपण बोलतोय इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांच्याविषयी. ऋषी सुनक यांनी आता जागतिक स्तरावरील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये 'वरिष्ठ सल्लागार' म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. यात अमेरिकेची टेक दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीचा स्टार्टअप अँथ्रॉपिक यांचा समावेश आहे.
सुनक यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये ही माहिती दिली. जुलै २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा त्याग केला होता, मात्र ते अजूनही ब्रिटिश संसदेचे सदस्य आहेत.
मायक्रोसॉफ्ट आणि AI कंपनीत धोरणात्मक मार्गदर्शन
- ऋषी सुनक यांचा वॉल स्ट्रीट बँक आणि हेज फंड्समध्ये काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी जुलै २०२५ मध्ये गोल्डमॅन सॅक्समध्येही सल्लागार म्हणून भूमिका स्वीकारली होती.
- कामाचे स्वरूप : अँथ्रॉपिक आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांमध्ये सुनक यांचे काम जागतिक धोरण, स्थूल-आर्थिक कल आणि भू-राजकीय समस्यांवर उच्च स्तरावरील रणनीतिक सल्ला देणे असेल.
- महत्त्वाचे म्हणजे, ते कंपन्यांना ब्रिटनच्या धोरणांवर सल्ला देणार नाहीत किंवा अँथ्रॉपिकच्या वतीने यूके सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार नाहीत. त्यांची भूमिका केवळ जागतिक स्तरावर केंद्रित असेल.
मिळणारे मानधन सेवाभावी संस्थेला दान
माजी पंतप्रधान सुनक यांचा विवाह इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झाला आहे. अक्षता मूर्ती या अब्जाधीश आहेत.
सुनक यांनी लिंक्डइनवर सांगितले की, मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रॉपिकमधून त्यांना मिळणारे वेतन ते आपली पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत सुरू केलेल्या "द रिचमंड प्रोजेक्ट" नावाच्या सेवाभावी संस्थेला दान करतील.
वाचा - दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
तंत्रज्ञान जगाचे भविष्य ठरवेल
आपल्या नवीन भूमिकेबद्दल उत्साह व्यक्त करताना सुनक यांनी लिहिले की, "तंत्रज्ञान जगाला बदलेल आणि भविष्याचा मार्ग ठरवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असेल, असे माझे नेहमीच मत राहिले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आपली अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि समाज यांच्यासाठी कसा करायचा, हे ठरवणाऱ्या या दोन्ही कंपन्यांना (मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रॉपिक) मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे."